राजू कलाने @प्रतिनिधी अमरावती
करे अल्पज्ञानी बहू बडबडाट, जला निर्झराचा अति खळखळाट, असे पूर्णज्ञानी कमी बोलणारा, विना नाद वाहे जशी गंगाधारा. अर्थात समाजात अनेक प्रकारचे लोक असतात, काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर काही बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्त्व देतात, निर्झरा सारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारे सारखे संथ वाहत अवघा मतदार संघ आपल्या विकास कामांनी व्यापून टाकणारा एक दमदार आमदार म्हणून मी डॉ. रामदासजी आंबटकर यांना ओळखते. महाराष्ट्राची भूमी मोठी सुदैवी आहे, कारण इथे वाडवडिलांच्या सेवेचा वारसा मोठया अभिमानाने सांगितल्या जातो. अश्याच सेवेचा वारसा ज्यांना लाभला असे भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आमचे नेते व आमदार माननीय डॉ. रामदासजी आंबटकर. रामदासजींना घरातच संघ आणि भाजपा विचाराचे बाळकडू मिळाले. वडील भगवानराव आंबटकर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील एक मोठे सत्याग्रही नेते. बाणेदार वृत्ती, त्यागमय भावना, निस्वार्थ कार्य करण्याची प्रवृत्ती व संघाप्रति निष्ठा या गुणांनी परिपूर्ण असलेल्या भगवानरावांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन संघ कार्याला वाहून घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करत असताना त्यांनी वर्धा शहरात सर्वप्रथम संघ शाखा सुरू करण्याचा बहुमान मिळविला सोबतच आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत स्वतःला झोकून दिले. सामाजिक समरसतेचा आदर्श घालून देणाऱ्या भगवानरावांचा पुत्र म्हणून रामदासजींचा उल्लेख गौरवाने करता येईल. रामदासजींचा जन्म एक जुलै 1960 साली वर्धा जिल्ह्यातील वडनेर या गावी झाला. घरी पित्याचा वैचारिक वारसा ,संस्कार व शिस्त होतीच, लहानपणापासूनच रामदासजींनी बहिण भावंडांसह संघ शाखेची वाट धरली, स्वयंसेवक म्हणून वावरतांना संघ शिस्तीचे धडे गिरवत गेले आणि नकळतच संघ संस्काराच्या मुशीत रामदासजी विद्यार्थीदशेपासूनच तयार होत गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते भाजपा महाराष्ट्राचे महामंत्री व पुढे आमदार हा त्यांचा प्रवास अतिशय खडतर व संघर्षमय आहे, संघ व पक्षाचे काम करीत असताना भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री, उपाध्यक्ष, अकोला भाजपा व अमरावती जिल्ह्याचे संघटनमंत्री, पश्चिम विदर्भाचे संघटन मंत्री ,भाजपा महाराष्ट्राचे महामंत्री व आता आमदार अशी विविध पदे त्यांनी अतिशय कुशलतेने व संयमाने सांभाळीत या सर्व पदांना न्याय दिलेला आहे. ही पदे सांभाळत असताना त्यांचा विविध नेत्यांशी, भाजपा पदाधिकाऱ्यांशी संपर्क आला. त्यातल्या त्यात त्यांचावर अमरावती शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा विशेष स्नेह असल्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आपल्या भावना, आपला स्वानुभव व्यक्त केला. त्यांच्याच शब्दात मांडण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न. - भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष मा. श्रीमान किरणभाऊ पातुरकर यांच्या शब्दात, रामदासजी म्हणजे संघटन कौशल्याचे मूर्तिमंत प्रतीक. संघटनकार्य करीत असतांना सतत प्रवास, कार्यकर्त्यांशी प्रचंड संपर्क याचं अजब-गजब ताकतवर रसायन म्हणजे रामदासजी आंबटकर होय. संघटन कार्य करीत असताना रामदासजी कधी एका गावात खूप दिवस राहिले असतील असं चित्र दुर्लभ. प्रवासाचा उद्देश फक्त एकच संघटन आणि संघटन, त्यांच्या सारखे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी जवळ आहे म्हणून आज भाजपा मजबूत आहे. व्यक्ती व व्यक्तीवर प्रेम न करता संघटनेवर प्रेम कसं करावं ते रामदासजी कडून शिकण्यासारख आहे, त्यामुळेच भाजपा सारखा पक्ष राष्ट्रीय स्तरावर पोहोचला. भाजपा मध्ये असताना भाजपाचा जो सिद्धांत आहे, तोच त्यांचा सिद्धांत होता. प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी व्यक्ती. आणि हाच सिद्धांत त्यांनी आजपर्यंत टिकवून ठेवला आहे. माझे भाग्य आहे की, मला रामदासजींच्या वडिलांसोबत वर्धा भाजपाचे अध्यक्ष असताना काम करण्याची संधी मिळाली. रामदासजींना त्यांच्या आयुष्यामध्ये, राजकारणामध्ये सुयश चिंतितो व त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते शिवरायांची कुलकर्णी यांच्या दृष्टीतून रामदासजी - दीर्घकाळ भाजपाचे संघटन मंत्री म्हणून काम केलेल्या रामदासजींच्या डोक्यात संघटन आणि संघटन हाच विषय नेहमी केंद्रस्थानी असायचा. कार्यकर्ता जोडावा आणि त्याला घडवावा ही त्यांची सहज व कृत्रिम वृत्ती. त्यासाठी मैत्रभाव निर्माण करावा लागतो आणि तो मैत्रभाव जपण्यासाठी मनाची दिलेरी लागते. कुबेराचा खजिन्यापेक्षाही मौल्यवान मित्रांची मोठी संपदा रामदासजींना लाभली आहे. अमरावती भाजपा काही काळ विपन्नावस्थेत असताना रामदासजीनी घेतलेल्या परिश्रमाचा मी साक्षीदार आहे. प्रवाहासोबत सारेच असतात पण प्रवाहाविरुद्ध जाऊन कार्य करण्याची अचाट शक्ती फक्त रामदासजी मध्ये दिसून येते. या कुशल संघटकाची, ती जिद्द, ती तळमळ आम्ही पाहिलेली आहे. संघटनेसाठी वेळ प्रसंगी अपमान सहन करणे आणि ते पचविण्याची ताकत असणे हे कठीण काम देखील त्यांनी संघटन मंत्री म्हणून केले आहे. विदर्भातील असे कोणतेही गावं नसेल की, जिथे रामदासजी यांचा प्रवास झालेला नाही. सतत पायाला भिंगरी आणि पक्ष वाढीची जिद्द, यामुळेच पक्ष उभा झाला. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवनात रामदासजीना एक विशेष स्थान आहे. भाजपा जगातील क्रमांक एकचा पक्ष बनविण्यामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान आहे त्यामध्ये डॉ. रामदासजींचे मोठे योगदान आहे. वाढदिवसानिमित्त मी त्यांना सुयश चिंतितो. अमरावती शहराचे प्रथम नागरिक व महापौर चेतनजी गावंडे डॉ.रामदासजी बद्दल आपला स्वानुभव मांडतांना म्हणाले की, आठवणींच्या संदूकीत नेहमीच तलम रेशमी घटनांचे संदर्भ असतात, असे नव्हे तर त्यात अनेक जाड्याभरड्या नकोशा वाटणाऱ्या स्मृतींचे भग्नावशेष ही असतात, मात्र त्या सार्या आठवणींना शब्दांचा मुलामा चढविला तर त्याची तीव्रता आपल्याला मृदू, मुलायम करून डोळ्यांच्या कडा पानावल्याशिवाय राहत नाही. अशाच काहीशा भावना त्यांनी रामदासजीच्या वाढदिवसा निमित्त व्यक्त केल्या. मला आजही तो प्रसंग आठवतो, जेव्हा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नामदार नितीनजी गडकरी यांचा सत्कार समारंभ अमरावतीमध्ये आयोजित करण्याचे ठरविले होते. त्यावेळी भाजपाची अमरावती शहरातील परिस्थिती अतिशय बिकट होती, त्यावेळी नामदार नितीनजी गडकरी यांच्या सत्कार समारंभ नियोजनाच्या वेळी माझा आणि डॉ.रामदासजींचा परिचय झाला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधील गुण शोधून काढून त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र एक केला, त्यामुळेच आज माझ्यासारखा कार्यकर्ता महापौर पदापर्यंत जाऊन पोहोचला. गरजूंना चाकोरीबाहेर जाऊन मदत करणारा, पक्षाचा अभिनिवेश न बाळगता सर्वसमावेशक राजकारण करणारा व गंभीरपणे विकासाचे राजकारण करणारा कुशल संघटक म्हणून रामदासजींचा उल्लेख होतो. मानवी मूल्याप्रती, प्रतिबद्धता व्यक्त करणारे कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणून रामदासजींना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. रवींद्र खांडेकर यांच्या नजरेतून रामदासजी... रामदासजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्यात असलेल्या संघटन कौशल्याच्या गुणामुळेच आज अमरावती शहर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी चे नाव सर्वांच्या मुखी झाले. आपल्या जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासून तर भाजपा पश्चिम विदर्भ संघटनमंत्री म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात, त्याला न्याय देण्यास सतत संघर्ष करीत
राहिले. कार्यकर्त्यांना वेळ देऊन, त्यांच्या भावनांना स्थान देऊन जिल्ह्यातील संघटनात्मक बाबींवर त्यांच्याशी चर्चा करून, त्यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार व प्रसार केला . आणि याचाच एक अनुभव म्हणून ज्यावेळेस अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक होती, त्यावेळेस अमरावती शहरातील दिग्गज नेते व नुटा संघटनेचे संस्थापक, प्रा. बी. टी. देशमुख यांच्याविरोधात निवडणूक जिंकणे अशक्यप्राय होते. एक वेळेस बारामतीमध्ये शरद पवारांना हरवणे सोपे आहे पण बी टी देशमुखांना हरवणे कठीण आहे असे बोल बोलल्या जात असतानाच रामदासजींनी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन ही निवडणूक जिंकायचीच आहे असे म्हणून राजकारणात नवख्या असणाऱ्या डॉ. रणजीत पाटील यांना पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून उभे केले असता केवळ शिक्षकांची नोंदणी न करता, त्यांनी प्रत्येक पदवीधरांची नोंदणी करून घेतली. आणि हा शिवधनुष्य रामदासजींनी लीलया पेलत बी. टी. चा पराभव करुन दाखवला. खऱ्या अर्थाने जर या निवडणुकीत विजयाचे श्रेय कोणाला द्यायचे असेल तर ते रामदासजींना. अशा रामदासजी बरोबर मलाही निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. रामदासजी कडे पाच जिल्ह्याचे संघटन करण्याची जबाबदारी असल्यामुळे, त्यांचे संघटन कौशल्य या निवडणुकीत दिसून आले. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला माझा मनःपूर्वक शुभेच्छा.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य व माजी स्थायी समिती सभापती तुषारजी भारतीय यांच्या नेत्रकडेतून डॉ.रामदासजी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासून रामदासजी सोबत काम करताना, कार्यकर्त्यांचे पालक, मित्र अशी दुहेरी जबाबदारी पार पाडून संघटन कसे करायचे हे आम्ही रामदासजीं कडून शिकलो . रामदासजी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. बैठक घेताना कंटाळवाणी होऊ न देता, सहजतेने, सर्वांशी संवाद साधत निर्णय घेण्याची त्यांची पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. रामदासजींच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे गाणे गाणे. अतिशय सुमधुर आवाजात त्यांचं गाणं ऐकणं म्हणजे, ही एक पर्वणीच असायची. भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा संघ परिवारामध्ये रामदासजींच्या शब्दाला मान होता, विद्यार्थी-विद्यार्थिनी सोबत काम करत असताना त्यांचा धाक असायचा. त्यांच्यासोबत अनऔपचारिक गप्पा करताना मनाला आनंद व्हायचा. बरेच कार्यकर्ते पक्षा सोबतच, आपल्या कुटुंबाच्या समस्या देखील रामदासजींना सांगत. आम्ही संघटना किंवा इतर ठिकाणी जे काम करत आहोत ते केवळ रामदासजींच्या आशीर्वादामुळेच. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष जयंतभाऊ डेहनकर यांच्या नेत्रचक्षुतून रामदासजी. रामदासजी म्हणजे पुर्णतः निरपेक्ष भावनेने आपले आयुष्य संघटनेसाठी समर्पित करणारा कार्यकर्ता होय. जी समृद्धपरंपरा भारतीय जनता पार्टीला लाभली आहे त्याच परंपरेतील एक निष्ठावंत सैनिक, एक पाईक म्हणून रामदासजी यांचा उल्लेख करता येईल. निष्ठेने आणि समर्पित भावनेने पक्ष संघटनेच्या विस्तारा सोबतच सर्वसामान्यांच्या भावना जपत संघटनेला सर्वस्पर्शी करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करीत राहणारा परीस म्हणजे रामदासजी. सर्वसामान्यांतून असे असामान्य नेतृत्व निर्माण होत असते.आज रामदासजीचा वाढदिवस, त्यानिमित्त शुभेच्छा देत असताना मला एवढेच म्हणावेसे वाटते की, हजारो की गिनती तो नही आती, लेकिन खयाल कुछ ऐसा है की, रेत का हर जर्रा यदी हिरा बन जाये तो, तोहफे मे हम आपको पुरा रेगिस्तान दे देंगे. अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती राधा कुरील यांची रामदासजी बद्दल भावना- मेरा रामदास जी से पहिला परिचय तब हुआ जब मै नगरसेविका थी, और वह पश्चिम विदर्भ के संघटन मंत्री थे. उस समय अमरावती जिले मे भारतीय जनता पार्टी की हालत बहुत खराब थी. लेकिन रामदासजी ने अपने संघटन कौशल्य के दम पर, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओ में नई जान फुकी, एवम संपूर्ण जिले मे भारतीय जनता पार्टी को फिरसे खडा किया. उनका संघटन कौशल्य तथा अत्यंत शांत संयमी स्वभाव, सबको साथ लेकर चलने की उनकी नीती, पक्षनिष्ठ कार्यकर्ताओं को विशेष महत्त्व देकर उनके हर सुखदुःख में सम्मिलित होना उनका विशेष गुण है. पार्टीको ही सर्वतोपरी माननेवाले रामदासजी अपने आप मे बिरले है. संघटन कौशल्य में निपून तथा पक्षनिष्ठ रामदासजी साधारण परिस्थिती में राजकारण मे आये, उनके द्वारा किये गये कार्यने पक्ष की गरिमा बढाई तथा पक्ष कार्यकर्ता को भी सम्मानित किया. कार्यकर्ताओं की गलती पर उनको डाटनां तथा अच्छे कार्य के लिए सबके सामने उनकी तारीफ करके उनको प्रोत्साहित करना, यह रामदासजी का विशेष गुण है. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा अमरावती जिल्ह्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीपजी शिंगोरे यांच्या दृष्टिकोनातून रामदासजी- डॉक्टर रामदासजी म्हणजे महाराष्ट्रातील भाजपाचे एक चाणक्य. जेव्हा जेव्हा माझा रामदासजी सोबत संबंध आला, त्या त्या वेळी मला त्यांच्यातील एक अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता, एक कुशल संघटक, एक अत्यंत परिपक्व राजकारणी, एक संयमी आणि कमालीचे नेतृत्व हे गुण पाहायला मिळाले. भाजपच्या इतिहासात महाराष्ट्रात भाजपाची स्थिती मृत्यूशैय्येवर असताना, कार्यकर्त्यांची वानवा असताना, अत्यंत शोचनीय परिस्थिती असताना मी व माझ्या सारख्या बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, त्यांनी भाजपची विस्कटलेली घडी नीट बसवली, आणि हे त्यांचे मोठे दुर्दम्य साहस होते. माझ्या 2009 च्या विधानसभा इलेक्शन मध्ये रामदासजी यांनी एखाद्या दीपस्तंभासारखे आमचे मार्गदर्शन केले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जी मरगळ, जी विषण्णता कार्यकर्त्यांमध्ये होती, ती 2010 नंतर पूर्णपणे नष्ट करून, एक नवि उभारी पक्षाला दिली. जोमाने काम करणारा विजूगीशी कार्यकर्ता तयार करणारे, रामदासजी म्हणजे जादूगर.परिस्थिती कठीण असतांना परिस्थितीला हताश न होणारा शिलेदार, सरदार म्हणजे रामदासजी. युद्धनीतीकारक रामदासजी यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त या चाणक्याला खूप खूप शुभेच्छा. वरील सर्व मान्यवरांनी रामदासजी बद्दल आपला अनुभव सांगताना त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे अतिशय सुंदर वर्णन केले . माझा सुद्धा रामदासजी सोबत गेल्या पंधरा वर्षापासून संपर्क आहे. महिला मोर्चाची अध्यक्ष असताना रामदासजी पश्चिम विदर्भाचे संघटन मंत्री होते तेव्हा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांच्यामधील अनेक चांगल्या गुणांचा सहवास मला लाभला, लाभ घेता आला त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं, हे मी माझे भाग्य समजते .रामदासजी म्हणजे स्थितप्रज्ञ. कार्यकुशल नेतृत्व, परिवारातील एक वडीलधारी व्यक्ती, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता, कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य सोबत संबंध जोपासणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व, असा रामदासजींचा मला नेहमीच अनुभव आला आहे. त्यांच्या बद्दल जेवढे ही सांगावे, तेवढे कमीच आहे. रामदास जीच्या वाढदिवसानिमित्त लिहिताना मला आज खूप गर्व होत आहे, त्यांचा वाढदिवस म्हणजे जणू काही आपल्या कुटुंबातील वडीलधारी मंडळीचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना या जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना त्यांची सर्व स्वप्न साकार व्हावीत. त्यांचा वाढदिवस अनमोल क्षणांची आठवण ठरावी. आणि त्या आठवणीने त्यांचे आयुष्य अधिक उजळून निघावे, सुंदर व्हावे, हीच मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देते. सौ सुरेखा दिगंबर लुंगारे. नगरसेविका तथा माजी झोन सभापती मनपा अमरावती.

