गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव
जळगाव दि. 29 - राज्य शासनाने 24 फेब्रुवारी घेतलेल्या निर्णयानुसार येत्या 4 जुलैपासून महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना देखील 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. मात्र पाणीपुरवठा केंद्राच्या आस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू राहणार नाही. याबाबतचा शासन आदेश देखील निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व महाविकास आघाडी सरकारने ही मागणी मान्य केली. महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुवारी 2020 रोजी एका शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. त्यानुसार सर्व शनिवार व रविवारी सुट्टी देण्यात आली आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कर्मचारी राज्य शासनाचे कर्मचारी आहेत. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्य शासनाकडे केली होती. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी कर्मचारी हिताचा निर्णय घेतला आहे.
येत्या 4 जुलैपासुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सर्व कार्यालयाची वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत राहणार आहे. दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान अर्ध्या तासासाठी भोजन विश्रांती देण्यात येणार आहे. तर कार्यालयातील शिपायांसाठी सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या राज्यभरातील पाणीपुरवठा केंद्रावरील नियमित आस्थापनेवरील कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांना नियम लागू राहणार नाही.
