जितेश कारीया@ हिवरखेड प्रतिनिधी
मागील काही दिवसात प्रचंड तापमानामुळे तेल्हारा तालुक्यासह हिवरखेड परिसरातील अनेक गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सदर केळी पीक नुकसानीमूळे शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या बातम्या अनेक वर्तमानपत्रात आणि वाहिन्यांवर प्रसारित झाल्या होत्या. याची दखल घेत विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार अमोल मिटकरी यांनी थेट हिवरखेड, सोनवाडी, हिंगणी इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केळी पिकाच्या नुकसानीचा आढावा घेतला. केळी पिकांचे नुकसान पाहून आमदार मिटकरी यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागाचे अधिकारी इत्यादींसह चर्चा विनिमय करून विमा काढलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देऊ तसेच शासन दरबारी या विषयाचा पाठपुरावा करुन विमा न काढू शकलेल्या सर्वच केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार मिटकरी यांनी केले.
तत्पूर्वी नियोजित दौरा नुसार हिवरखेड येथील पत्रकार भवन येथे भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच सौ अरुणाताई ओंकारे, सत्कार मूर्ती नवनियुक्त आमदार अमोल मिटकरी, विशालराजे बोरे, माजी सरपंच संदीप इंगळे, सुरेश ओंकारे, मनीष भांबुरकर, डॉ.निलेश वानखडे, श्याम राऊत, सोपान कुटाळे, मिलिंद जाधव, इत्यादी मान्यवर विराजमान होते. सर्व मान्यवरांचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे स्वागत करण्यात आले. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आशिष सदानी आणि नितीन वानखडे पुरुषोत्तम गावंडे उमेश तिडके ह्यांनी आमदारांचे स्वागत केले. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक महेंद्र कराळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश पांडव, राहुल गिर्हे, जितेश कारिया, अनिल कवळकार, अर्जुन खिरोडकार, उमर बेग, जावेद खान, सूरज चौबे,धिरज बजाज इत्यादींनी परिश्रम घेतले.
ह्यावेळी मास्क लावून सोशल डिस्टंसिंगचे पालन करून शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली आणि अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे विविध समस्या आमदारांसमोर मांडल्या. त्यावेळी सर्व समस्या निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार मिटकरी यांनी नागरिकांना दिले.
