निवासी अतिथींनाच मिळेल खानपान सेवा
अमरावती, जि. 8 : जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळून इतर भागातील हॉटेल्स, गेस्टहाऊस व निवास व्यवस्थेबाबत आस्थापनांना त्यांच्या 33 टक्के कर्मचारी व प्रतिबंधित प्रवेशासह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भोजनालये बंदच राहतील. केवळ निवासी राहणा-या व्यक्तींनाच संबंधित गेस्टहाऊस भोजन पुरवू शकेल. इतरत्र राहणा-या व बाहेरून येणा-या व्यक्तींना भोजन देता येणार नाही.
यासंबंधीचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी निर्गमित केला. त्यानुसार, संबंधित आस्थापनांनी मर्यादित व निरोगी, मास्क असलेल्या अतिथींना प्रवेश द्यावा. त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र व ओळखपत्र अनिवार्य राहील. त्यांना आरोग्यसेतू ॲपचा वापर बंधनकारक आहे. प्रवेश कक्ष, पार्किंगमध्ये गर्दी न होण्याची खबरदारी घ्यावी. हँडवॉश, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, रिसेप्शन टेबलला संरक्षक काच यांचा वापर करावा. प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत फलक लावावेत. बिलासाठी डिजीटल पेमेंटचा पर्याय वापरावा.
गेस्टहाऊसच्या सभागृहात 33 टक्के किंवा 15 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. हॉटेलमधील जिम, तरणतलाव, लहान मुलांच्या खेळण्याची जागा बंद राहील. अतिथीने कक्ष सोडताच संपू्र्ण निर्जंतुकीकरण करावे व 24 तास त्या कक्षाचा वापर करू नये. लिफ्ट बटण, दरवाज्याच्या कडा, प्रशासन उपकरणे यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे.
कुणी आजारी व्यक्ती आढळल्यास तत्काळ स्वतंत्र कक्षात विलगीकरण करावे व रूग्णालय, पालिका-परिषदेच्या पथकाला माहिती द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
संचारबंदीच्या कालावधीत कृषी सेवा केंद्र सुरू राहतील
जिल्ह्यात दर आठवड्यात शनिवार व रविवारी सर्व बाजारपेठा बंद राहण्याबाबत आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र, शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने यादिवशी कृषी सेवा केंद्रे, कृषी निविष्ठा केंद्रे, कीटकनाशके विक्री केंद्रे, बी-बियाणे केंद्रे नियमित वेळेत सुरु राहतील. याबाबत तसे शुद्धीपत्रकही निर्गमित करण्यात आले.
