Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दहावीच्या परीक्षेत सायली व पार्थ ने घडविला इतिहास

Responsive Ad Here

प्रतिनिधी @ गौरव टोळे.

कौसल्याबाई बारब्दे विद्यालय चिंचोली बुद्रुक चा १००% निकाल

सामान्य शेतमजुराची मुलगी कु. सायली अमोल भेलकर आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असणारा चिरंजीव पार्थ अशोकराव वानखडे या शेतकरी पुत्राने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून इतिहास घडविला व खऱ्या अर्थाने भाऊ साहेबांचे स्वप्न साकार केले. अतिशय बिकट आर्थिक परिस्थिती असताना सायलीने अतिशय मेहनत करून ९६.८०% तर आपल्या अंधत्वावर मात करीत पार्थ ने ९४.६०% गुण घेऊन विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यासोबतच कु. गायत्री घाटोळ ८८.२०%, कु. श्रेया मुऱ्हेकर ८७.६०% व कु. प्रतीमा खंडारे ८५.८०% असे गुण मिळवत यांनी सुद्धा विशेष प्राविण्य श्रेणीत स्थान मिळवले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित कौसल्याबाई बारब्दे विद्यालय चिंचोली बुद्रुक या शाळेचा दहावीचा निकाल १००% लागला असून उत्तीर्ण ४६ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ०९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. दिव्यांग पार्थ ने गणितात १००/१०० गुण घेत डोळस विद्यार्थ्यांसमोर अनोखा आदर्श ठेवला.विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष डॉ. आर. एन. शेळके यांच्यासह शिवसंस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी व शाळा समिती सदस्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व शिक्षिका यांचे अभिनंदन केले आहे.


पार्थला 'आय ए यस' व्हायचं आहे
अभ्यास करताना माझ्या सर्व शिक्षकांनी माझ्यातील उणिवांची कधीच जाणवू दिले नाही. वडिलांनी शेतीचे कामे सांभाळत माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले. मुख्याध्यापक राजेंद्र गायगोले सरांनी सतत प्रेरणा दिली. अभ्यासासाठी ब्रेल लिपीतील पुस्तके तसेच NAB INDIA व स्नेहांकित या संस्थेच्या हेल्पलाइनची मदत घेतली. माझ्या पूर्वीच्या डॉक्टर भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती या शाळेतील शिक्षक योगेश चौधरी यांनी ब्रेल लिपीतून अभ्यास करून घेतला. भविष्यात मला 'आय ए यस' म्हणून जनसामान्यांसाठी व दिव्यांगाकरिता काम करायचे आहे, असे पार्थ म्हणाला.

सायलीला बनायचे आहे प्रशासकीय अधिकारी
अत्यंत कष्ट सोसून माझ्या आई-वडिलांनी मला शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीचा पुरेपूर वापर करून मला माझे ध्येय गाठायचे आहे. मला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासनात अधिकारी म्हणून काम करायचे असल्याचे प्रतिपादन सायली भेलकरने केले.

शेवट गोड झाला - राजेंद्र गायगोले
शैक्षणिक क्षेत्रात ३४ वर्ष सेवा देताना मी पुढच्या ३ महिन्यांनी सेवानिवृत्त होत आहे. या टप्प्यावर माझ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून माझ्या सेवेचा सन्मान केला. खऱ्या अर्थाने सेवेचा शेवट गोड झाला. पार्थ, सायली व असे अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत. फक्त गरज आहे त्यांना संधी देण्याची, ते काम मी केले.