मो.असलम परवेज; तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षा अर्ज भरण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. कोरोनाच्या धोक्यामुळे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना भरण्याची सोय करण्यात आली होती. नियमित विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं २३ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१ दरम्यान अर्ज भरण्याची मुदत दिली होती. ही मुदत आज समाप्त होणार होती. अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे काम अपुरे राहिले होते. आता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाने दिलासा दिला आहे.
बोर्डाच्या परिक्षेचा फॉर्म भरण्यासाठीच्या तारखेमध्ये मुदतवाढ देण्यात आली असून तसे परिपत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. एकीकडे कोरोना व्हायरसमुळे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता २०२०-२१ च्या वार्षिक परीक्षा देखील जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यात दहावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि फॉर्म न भरता आल्याने त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकर दूर केल्या जातील. अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरताना वेबसाईट हॅक होण्यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज करणे राहिले आहे.
अखेर शिक्षण मंडळाने सर्व बाजूंचा साराचार विचार करुन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवून ती २५ जानेवारी ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता न करता ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज व्यवस्थित भरावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. नियमित विद्यार्थी www.mahasscboard.in या संकेतस्थळावरून परीक्षा अर्ज भरू शकतात. खासगी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले आणि श्रेणी सुधार योजनेतील विद्यार्थीही याच कालावधीत अर्ज भरू शकतात, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
