मो.असलम परवेज; लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार तालुक्यातील ग्रामपंचयतीच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या ८८ जागांसाठी २३ ते ३० डिसेंबर दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांकडे ४२५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर ३०१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब अजमावत आहेत.
लोणार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरू लागला आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आता मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेताना दिसत आहे. मात्र तरीही यावेळी पहिल्यांदाच सोशल मिडियावरील हायटेक प्रचाराला प्राधान्य दिले जात असल्याने चित्र आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुक उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आणि उमेदवार प्रचाराला लागले. या वेळी अनेक उमेदवारांनी अतिशय कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचता येणाऱ्या सोशल मिडिया या माध्यमाला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.
"अमुक पॅनेलच्या तमुक उमेदवाराला मत म्हणजे विकासाला मत" अशी घोषवाक्य उमेदवाराच्या हात जोडलेल्या फोटोसह सोशल मिडियावर वायरल केली जात आहेत. काही उमेदवारांनी मात्र सोशल मिडियाला बाजूला ठेवून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेण्यावर भर दिला आहे.
15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होत असल्याने जाहीर प्रचाराला केवळ चार दिवस उरले आहेत त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे समर्थक अन्य सारी कामे बाजूला ठेवून प्रचाराचा धुरळा उडवताना दिसत आहेत.
