मो.असलम परवेज; लोणार तालुका प्रतिनिधी
जिल्ह्यात आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने सकाळी ७:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत सुरू राहणार
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलडाणा, एस. रामामुर्ती यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७, फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) (३) अन्वये कोविड -१९ च्या अनुषंगाने दिनांक ०१ जून २०२१ चे सकाळी ७:०० वाजेपासुन ते दिनांक १५ जुन २०२१ चे सकाळी ७:०० वाजेपावेतो नवीन निर्बंधासह प्रतिबंधात्मक आदेश दिनांक ३१ मे २०२१ रोजी पारीत केले आहे.
राज्यातील कडक निर्बंध १५ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. रुग्णसंख्या कमी झालेल्या जिह्यांना मात्र निर्बंधांमधून दिलासा देण्यात आला आहे. तेथील आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. आवश्यक गटात नसलेली दुकाने उघडणे आणि त्यांच्या वेळा याचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर सोडण्यात आलेला आहे. याविषयीची नवी नियमावली सरकारने जाहीर केली. त्यानुसार अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलडाणा, एस. रामामुर्ती यांनी दि.१९/०५/२०२१ रोजीच्या आदेशानुसार आवश्यक गटात असणाऱ्या दुकानाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ७:०० ते दुपारी २:०० पर्यंत तसेच शनिवार व रविवार सकाळी ७:०० ते ११:०० पर्यंत केले आहे. म्हणजेच या अगोदर ज्या दुकानांना उघडण्याची परवानगी होती त्यांनाच या आदेशान्वये वेळ वाढवून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आता जिल्ह्यामध्ये शनिवार व रविवारला सुद्धा दुकाने उघडी राहणार आहे.
रुग्णसंख्या कमी झालेल्या जिह्यांसाठी
ज्या महानगरपालिका आणि जिह्यांमध्ये कोविड संसर्गाचा दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तसेच तेथील ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तिथे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मॉल्स, शॉपिंग सेंटर्समधील दुकाने उघडण्यास मनाई, आवश्यक वस्तूंच्यासोबत आवश्यक वर्गात नसलेल्या वस्तूंचे ऑनलाइन वितरण करता येणार. दुपारी ३ नंतर वैद्यकीय किंवा इतर अत्यावश्यक प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध. शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू राहणार. उपस्थिती वाढवण्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक, कृषिविषयक दुकाने कामाच्या दिवसांना दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहू शकणार. पावसाळा, पेरणीच्या हंगामात त्यांच्या वेळा वाढवण्याचे तसेच शनिवार, रविवार सुरू ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्राधिकरणावर राहील.
रुग्णसंख्या वाढलेल्या जिह्यांसाठी
कोरोना पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त आणि एकूण ऑक्सिजन बेड्सपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील तर असे जिल्हे आणि पालिका क्षेत्रातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. जिह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करणार. कुणालाही आत-बाहेर जाण्यास मनाई मृत्यू, वैद्यकीय कारण, आणीबाणी असेल तरच परवानगी राहील. कोविड प्रसंगीची सेवा देणाऱया व्यक्तींना परवानगी, अवश्य वस्तूंची वाहतूक कायम राहणार, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना वस्तूंची विक्री करण्यास मनाई राहणार आहे. नियम मोडणारी दुकाने कोरोना साथ संपेपर्यंत बंद ठेवावी लागणार आणि दुकानदाराला दंडही होणार. कसदर आदेशाचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था संघटना, भारतीय दंड संहिता,१८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ से ६० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर आदेश दिनांक ०१/०६/२०२१ चे सकाळी ७.०० वाजेपासुन ते दिनांक १५/०६/२०२१ चे सकाळी ७.०० वाजेपर्यत लागु राहील.
