मो.असलम परवेज: लोणार तालुका प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील ' शारा' गावात आश्चर्यचकित करणारी घटना" मंगळवारी दिनांक २ जून २०२१ रोजी दुपारी घडली आहे. साधारणतः ही घटना पावसाळ्यात घडली असती तर एवढे आश्चर्य लोकांना झाले नसते परंतु कडक उन्हाळ्यात अशी घटना घडणे ही बाब निश्चितच सर्वांसाठी आश्चर्याची आहे. म्हणून लोकांनी याचे उल्लेख "विहिरीत अवतरली गंगा" असे केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शारा या गावातील शेतकरी नंदकिशोर डव्हळे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते, कडक उन्हाळ्यात जवळपास 40 फुटापर्यंत खोद झाल्यावर अचानक पाण्याचा मोठा झरा उडाला. हे झरा इतका मोठा होता की याला पाहून खोदकाम करणारे मजूर-कामगार तसेच आजूबाजूला असणारे गावकरी आश्चर्यचकित झाले व विहिरीत गंगा अवतरल्याचे सर्वत्र चर्चा सुरू झाले. पाण्याची आवक इतकी होती की ३ ते ४ फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. पुढील २४ तासातच विहिरीत २० फुटांपर्यंत पाणी जमा झाल्याने त्यांनी आता खोदकाम थांबवले आहे.
या घटनेची बातमी परिसरात पसरताच आजूबाजूच्या गावातील लोक विहिरीत अवतरलेली गंगा पाहण्यासाठी मोठी गर्दी करू लागले. या घटनेने भूगर्भ अभ्यासक सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत व त्यांच्यासाठी अभ्यासाचे नवीन बाब सुरू झाले आहे.
