हिवरखेड रूप: जितेश कारीया
इंटरनेटच्या युगात नात्यांमधील ओलावा कमी होत असताना नात्यांची वीण घट्ट करणारा पाच पिढ्यांचा संगम नुकताच चार परिवाराला सुखद अनुभव देवून गेला. या दुर्मीळ भेटीत पाच पिढ्यांच्या नात्यांना उजाळा मिळाला. नातं कोणतंही असो त्यामध्ये प्रेम, जिव्हाळा असला की त्याचा गोडवा काही वेगळाच असतो. पिढ्यानपिढ्या नाती जपणारी माणसे आजही पाहायला मिळतात. त्यातही पाच पिढ्यांचा एकत्र भेटीचा योग दुर्मिळच अनुभवायला मिळतो. खापरपणजी व नातीच्या अविस्मरणीय भेटीने नात्यांना उजाळा मिळाला.
यावेळी वयोवृध्द खापरपणजी श्रीमती नर्मदा वानखडे (कारखेडा, यवतमाळ) पणजी सौ. अनुसया आरेकर (महागाव,यवतमाळ) आजी सौ. सुनंदा गिऱ्हे हिवरखेड, अकोला) आई सौ. मंजिरी ठोंबरे (मोर्शी,अमरावती), कु.मनस्वी नितीनराव ठोंबरे (मोर्शी, अमरावती) यांच्या सोबत भेटीचा क्षण चिमुकली कु. मनस्वी ठोंबरे हिने अनुभवला. चारही परिवारासाठी औत्सुक्याचा विषय होता. त्या पाच जणी अापल्या पिढीचं प्रतिनिधित्व करीत एकत्र आल्या तेव्हा आनंदाला उधाण आले होते. आठवणींमध्ये रमून गेल्या. गप्पांची मैफिल रंगली. त्या पाच पिढ्यांचा संगम नात्यांची वीण घट्ट करणारा ठरला.
