जितेश कारीया हिवरखेड
गुरुपौर्णिमा निमित्त श्री देविदासजी महाजन सरांचा होणार सत्कार
एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन ते चार पिढ्यातील हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे ऋषितुल्य गुरु हिवरखेडात असून ह्या गुरूंचे नाव आहे श्री देविदासजी नारायणरावजी महाजन. महाजन सर म्हणजे चालते बोलते गुरुकुल...गुरुपौर्णिमा निमित्त आज दि 23 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता त्यांचा सत्कार विठ्ठल मंदिर पांडुरंग संस्थान येथे श्री संजयजी गिऱ्हे यांच्या सौजन्याने होत आहे. श्री देविदासजी नारायणरावजी महाजन यांचा जन्म 15 सप्टेंबर 1933 रोजी झाला. आज रोजी त्यांचे वय 88 वर्ष असून आजही ते शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे त्यांनी आपल्या दीर्घ कार्यकाळात तीन ते चार पिढीतील हजारो विद्यार्थी घडविले असून त्यांचे अनेक शिष्य आज उच्च शासकीय पदावर आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर आरूढ आहेत. तर अनेक शिष्य व्यवसायात मोठमोठे शिखर गाठत आहेत. ज्याकाळी ग्रामीण भागात चौथी आणि सातवी पास विद्यार्थ्यांना सुद्धा उच्चशिक्षित मानले जायचे त्या काळात महाजन सरांनी इंटर सायन्स आणि बी.ए., बी.एड. करून ज्ञानार्पणाचा वसा घेतला.
त्यांनी जिल्हा परिषद महात्मा गांधी महाविद्यालय हिवरखेड येथे 1953 ते 1991 असे तब्बल 38 वर्ष अविरत ज्ञानदानाचे कार्य केले. निवृत्तीनंतरही त्यांचे ज्ञानदानाचे कार्य थांबले नाही आणि वैयक्तिक स्तरावर त्यांनी अनेक वर्षांपर्यंत विद्यार्थी घडविणे सुरूच ठेवले. ह्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना त्यांच्या जीवनसंगिनी सौ सुषमा महाजन यांची समर्थ साथ मिळाली. ते गणित आणि विज्ञान विषयाचे तज्ञ शिक्षक म्हणून परिचित आहेत. सोबतच मराठी भाषेचा दांडगा अभ्यास त्यांना आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्यांना तोंडपाठ आहेत. त्यांनी किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती सुरू ठेवलेली आहे. हिवरखेड येथील जैन मंदिर पडक्या अवस्थेत असताना त्यांनी स्वतः आणि लोकवर्गणीतून लोकांच्या सहकार्याने जैन मंदिर चा जीर्णोद्धार केला. विठ्ठल मंदिरचे सुद्धा ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांना वारकरी संप्रदायाबद्दल विशेष आवड आहे. तारुण्याच्या काळात कबड्डी खेळताना पाय मोडल्याने त्यांच्या कारकीर्दीचे दोन वर्ष वाया गेले होते. विविध विषयातील अभ्यासाची आवड असल्याने ज्ञानाचा खजिना त्यांच्याजवळ असून हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या कडून ज्ञानामृत मिळाले आहे अशा या ऋषितुल्य गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु वंदन करीत आहोत