हिवरखेड प्रतिनिधी:- जितेश कारिया
विविध विषयांचा आढाव्यासाठी तेल्हारा तालुक्याचा झंझावाती दौरा
अकोल्याच्या तडफदार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचा विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी तेल्हारा तालुक्याचा झंझावाती दौरा रविवारी संपन्न झाला. वारी हनुमान येथील वाण धरण, कालवा क्षेत्र, आणि मेळघाट मधील पुनरवसित झालेल्या तलाई, उमरशेवडी इत्यादी गावाला भेटी दिल्या.
सदर दौऱ्यात त्यांनी पुनर्वसित नागरिकांच्या इत्यंभूत समस्या जाणून घेतल्या आणि आवश्यक उपाय योजना विषयी माहिती घेतली. तदनंतर त्यांचा ताफा वारी येथील वाण धरणावर धडकला. तेथे ज्येष्ठ भूवैज्ञानिक बर्डे साहेब, विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी, जागरूक नागरिक इत्यादींनी आपापल्या मागण्या, अत्यावश्यक असलेली कामे याबाबत जिल्हाधिकार्यांना साकडे घातले.
यावेळी हिवरखेड विकास मंच चे संयोजक धिरज बजाज, पत्रकार गजानन दाभाडे, सुरज चौबे, उमर मिर्झा, यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करताना वान धरण निर्मितीनंतर मागील 25 वर्षांपासून गाळाचा उपसा केला गेला नाही. त्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढ होण्याऐवजी घटच होत आहे. जर वान धरणातील गाळ काढला तर तर भूजल पातळी वाढेल, जलसाठ्यात सुद्धा वाढ होईल, अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्ते नुतनीकरणासाठी मुरूम उपलब्ध होईल, आणि शेतकऱ्यांच्या शेतात गाळ पोहोचल्यास जमीन सुपीक होईल. असा चार स्तरीय फायदा होऊ शकतो ही बाब धिरज बजाज आणि सहकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली यावर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आत्मीयतेने सर्वांच्या भावना जाणून घेतल्या. आणि अधिकाऱ्यांना विचारणा केली.
ततपश्चात वाण धरण परिसरातील शेतकर्यांच्या कोरड्या पडलेल्या विहिरीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी शेलार साहेब, वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री बर्डे साहेब, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर, नायब तहसीलदार राजेश गुरव, गटविकास अधिकारी डॉ. भरत चव्हाण, विस्तार अधिकारी सतीश सरोदे, यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ, शंकरराव पुंडकर गुरुजी, प्रवीण वैष्णव, यांचेसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी खंडाळा येथील पर्जन्यमापन केंद्राची सुद्धा पाहनी केली.
