अकोला प्रतिनिधी शिरसाट
अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा डॉ अनिल उद्धवराव भिकाने यांची महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे संचालक, विस्तार शिक्षण या पदावर तिन वर्षासाठी नियुक्ती झाली असून त्यानी कालच या पदाचा डॉ ए पी सोमकुंवर यांचेकडून कार्यभार स्वीकारला आहे.
डॉ भिकाने यांचे रूपाने ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असणारे व जमीन स्तरावर कार्यरत महाराष्ट्रभर शेतकऱ्यांशी तर देशभर पशुवैदयकाशी नाळ जोडलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सर्वस्तरातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. डॉ भिकाने यानी उदगीर येथे २७ वर्षाची प्रदिर्घ सेवा दिली असून तत्पूर्वी चार वर्ष ते लातूर व परभणी येथे तर गेले वर्षभर अकोला येथे अधिष्ठाता पदावर कार्यरत होते.उदगीर व अकोल्याचे पशुवैद्यक महाविद्यालय लोकाभिमुख बनवण्यात तसेच महाराष्ट्रातील सुसज्ज अशा पशुचिकित्सालयाच्या उभारणीत सिंहांचा वाटा असणाऱ्या डॉ भिकाने यानी चिकित्सालयाच्या माध्यमातून निष्णात पशुवैद्यक विद्यार्थी घडवण्याबरोबर तोकड्या मनुष्यबळात गरजू शेतकऱ्याना अहोरात्र सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे डॉ भिकाने यानी प्रयोगशाळेच्या चार भितिंत न अडकता प्रत्यक्ष गोठ्यावर जावून मराठवाड्यातील अनेक बेरोजगार तरुणाना प्रोत्साहित करून दुग्ध व शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून स्वंयरोजगारासाठी प्रवृत्त केले आहे. त्यानी मराठवाड्यातील विविध खेड्यात ४५० पशुरोग निदान शिबीरा द्वारे दिड लक्ष पशुरुग्णाना सेवा दिलेली असून ६०० हून अधिक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम/ मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याना तांत्रीक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्या होवू नयेत म्हणून दुष्काळी तसेच कोरडवाहू भागातील शेतकऱ्यानी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे यासाठी १०० हून अधिक व्याख्यानातून मार्गदर्शन केले आहे. दुष्काळात मराठवाड्यातील ३७ चारा छावण्याना भेटी देवून पशुपालकाना बहुमोल मार्गदर्शन व रुग्णसेवा देण्याचे कार्य केले आहे. कोविडच्या संकटाच्या काळात गतवर्षात त्यानी११० दिवसाचे ४२ राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ऑनलाईन वेबीनार व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले व त्यात जगभरातील बारा हजाराहून अधिक शेतकरी व पशुवैद्यक क्षेत्रातील शिक्षक,शास्त्रज्ञ, विद्यार्थी सहभागी झाले. या कार्याबद्दल संस्थेस एक्सलन्स अवार्ड देवून सन्मानित करण्यात आले.
