हिवरखेड प्रतिनिधी:-जितेश कारिया
विशेष ग्रामसभा बोलावण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत समोर मूक प्रदर्शन
हिवरखेड शहराला नगरपंचायत घोषित करा अशी मागणी ग्रामस्थ गेल्या 22 वर्षांपासून करत आहेत. यासाठी आमरण उपोषण सुद्धा करण्यात आले. मागणी पूर्ण करण्यासाठी विधानपरिषदचे आमदार अमोलदादा मिटकरी यांनी अनेकदा विधिमंडळात आवाज बुलंद केला होता आणि अमोलदादा मिटकरी यांच्याच पुढाकारातून नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरपंचायत करण्याचे स्पष्ट सांगितले. उपोषणा दरम्यान पालकमंत्री महोदयांनी हिवरखेड नगरपंचायत करण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा वेळ मागितला असताना त्यांचे इच्छेविरुद्ध हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये दि. २१/०८/२०२१ रोजी नगरपंचायत करू नये लोकसंख्येच्या आधारे २ ग्रामपंचायती करण्यात याव्या असा ठराव मंजूर करण्यात आला परंतु या ग्रामसभेमध्ये गोंधळ झाल्यामुळे सदर विषयावर योग्य ती चर्चा झाली नाही. तहकूब झालेल्या सभेत गावाची फाळणी करण्याचा व नगरपंचायत करू नये असा अनैतिक ठराव घेऊन नगरविकास मंत्रालयात पोहोचविल्या गेला.
हिवरखेड नगरपंचायत करीता विशेष ग्रामसभा बोलावण्यासाठी यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात २ अर्ज दिले होते. त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आज शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हिवरखेड शहर तर्फे शिवसेना शहर प्रमुख आकाश इंगळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सुदाम राऊत व तालुका प्रसिद्धी प्रमुख धनंजय गावंडे यांनी शासनाचे कोरोना संबंधीचे नियम पाळून व हातात हिवरखेड नगरपंचायत झालीच पाहिजे, विशेष ग्रामसभेची तारीख द्यावी, असे फलक घेऊन मूक प्रदर्शन केले. सदर प्रदर्शनाची दखल घेत सरपंच व सचिव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अकोला व गटविकास अधिकारी तेल्हारा यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करू असे लेखी पत्र दिले.
