प्रदिप रघुते प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथून जवळच असलेल्या वाघोडा- धानोरा शिक्रा.चिखली.शिवणी परिसरात आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे .दिनांक सहा सप्टेंबर च्या अतिवृष्टी नंतर या भागात सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे .आज दुपारी वाघोडा.शिवणी परिसरामध्ये प्रचंड पावसाला सुरुवात झाली , दीड तास झालेल्या या पावसामुळे परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे , काढणीला आलेले सोयाबीन पिक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे .
या भागातून वाहणारे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे .वाघोडा येथील उपसरपंच ओम प्रकाश सावळे यांचे धानोरा शिक्रा शिवारामध्ये शेत आहे त्यांच्या शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्यामुळे त्यांच्या पूर्ण ४ एकर शेतामध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे त्यांच्या सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झालेले आहे .अशाच प्रकारे वाघोडा.धानोरा सिकरा.चिखली.शिवणी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे .
हाताशी आलेले पीक सोयाबिन.कपाशी.भाजीपाला. संत्रा.या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे ,सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्वरित पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .सहा सप्टेंबरला या परिसरातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे परंतू शासन स्तरावर पंचनाम्याचे आदेश देऊन सुद्धा आज पर्यंत कुणीही सरकारी अधिकारी शेतकऱ्यांचे नुकसान पाहण्यासाठी आलेले नाही .आज पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे उरलेसुरले पिक सुद्धा नष्ट झालेले आहे.
