Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आपत्तीग्रस्तांना शासकीय मदत जाहीर; सर्वाधीक भरपाई जळगाव जिल्ह्याला-पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Responsive Ad Here

जळगाव  प्रतिनिधी

 जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार लाभ 35 कोटी 35 लाख नुकसान भरपाई मिळणार


 यंदाच्या मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली असून यात सर्वाधीक ३५ कोटी ३५ लाख रूपयांची मदत ही जळगाव जिल्ह्यास जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून शेतकर्‍यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई मिळणार आहे.

  याबाबत माहिती अशी की, यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका पडला होता. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य मंत्रीमंडळाच्या १२ मे २०२१ रोजी झालेल्या बैठकीत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर येथील विभागीय आयुक्तांकडून १२२ कोटी २६ लाख ३० हजार रूपयांच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.  

या अनुषंगाने आज राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या मदतीच्या रकमेला मंजुरी दिली आहे. यात केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ( एसडीआरएफ) दरानुसार मदत अनुज्ञेय करून सर्व विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या विवरणानुसार ही मदत प्रदान करण्यात येणार असून आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आजच्या शासन निर्णयातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३५ कोटी ३५ लाख ३१ हजार इतकी रक्कम ही जळगाव जिल्ह्यास मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यंदा निसर्गाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकर्‍यांना मदत देण्याबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला होता. याची दखल घेऊन जिल्ह्यास भरीव मदत जाहीर करण्यात आलेली असून याचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

दरम्यान, आजच्या शासन निर्णयानुसार पीक आणि फळबागांचे ३३ टक्के जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ होणार आहे. या संदर्भात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांची संयुक्त स्वाक्षरी असणारे पंचनामे ग्राह्य धरून संबंधीत शेतकर्‍यांना ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून थेट जमा करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रशासनाने कोणत्याही प्रकारे शेतकर्‍यांना रोख रक्कम देऊ नये, तसेच बँकांनी यातून कोणत्याही प्रकारची कपात करू नयेत असे स्पष्ट निर्देश आजच्या शासन निर्णयात देण्यात आलेले आहेत.

 या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मार्च ते मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आधीच पंचनामे करण्यात आले असून त्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरच मदत मिळणार आहे. याप्रमाणे अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांनाही राज्य शासनाकडून आपण मदत मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचेही पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले आहे.