अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे
मोर्शी वरुड तालुक्यातील नागरिकांना दिली जाते अपमानास्पद वागणूक
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव (पेठ) येथील टोलनाक्याच्या बेंबदशाहीमुळे मोर्शी वरुड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. सदर टोल टॅक्स हा वरुड-मोर्शी मधील वाहनांना ४० रुपये किंवा किलो मीटर प्रमाणे टोल घेऊन सोडणे आवश्यक असतांना नांदगाव टोल नाक्यावरील कर्मचारी मोर्शी वरुड तालुक्यातील वाहन धारकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे प्रकार घडत आहे. नांदगाव टोल नाक्यावर मोर्शी वरुड तालुक्यातील नागरिकांना सवलत देऊन मोर्शी वरुड तालुक्यातील नागरिकांना सन्मानाची वागणूक देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोर्शी तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे.
चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा अमरावती ते नागपूरकडे जातो. परंतु वरुड, मोर्शी तालुक्यातील नागरिकांना सुध्दा विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो. यामुळे खासगी वाहनधारकांनीसुध्दा आपले भाडे वाढवून ग्राहकांवरच बोझा लादला आहे. या मार्गावरून जाणारी वाहने केवळ दहा किलोमीटरपुरता या रस्त्याचा वापर करीत असताना त्यांच्याकडून पूर्ण ५० किलोमीटर मार्गाचा टोल वसूल केला जात असल्याचे प्रकार घडत असून ही सरसकट लुबाडणूकच होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोर्शी तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ६ वर असलेल्या नांदगाव पेठ टोल नाक्यावरून जाणाऱ्या वरुड-मोर्शी तालुक्यातील वाहनांना टोल नाक्यावरील कर्मचारी असभ्य वागणुक देऊन, दबाव टाकून सक्तीची टोल वसुली करत असून नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.