गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल- एरंडोल येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन ११ डिसेंबर रोजी करण्यात आले होते , त्याचा फायदा समाजातील तळागाळातील लोकांना झाल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी दिली . या लोक न्यायालयात एरंडोल न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण २२ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली . तर ३८५ वादपूर्व प्रकरणे निकाली निघून जवळपास ४८ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली . त्याचप्रमाणे सौम्य शिक्षा असणारी ८ प्रकरणे निकाली काढण्यात आली . अशी एकूण ४१५ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली . राष्ट्रीय लोकन्यायालयात तहसिल कार्यालय , पंचायत समिती , MSEB , BSNL , सेंट्रल बँक , स्टेट बँक , बडोदा बँक यांच्याकडील थकबाकीची प्रकरणे ठेवण्यात आली होती
यावेळी इतिहासात प्रथमच तहसिल कार्यालयाच्या थकीत महसूल वसूल करण्यासाठीची वादपुर्व प्रकरणे लोक न्यायालयात ठेवण्यात आली होती , अशी माहीती दिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी दिली . त्यामुळे हा नविन पायंडा असल्याचे मानले जात आहे . भविष्यातही नव - नविन कल्पना आमलात आणून विधी सेवा समिती , एरंडोल मार्फत दिल्या जाणा - या सुविधांची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याचा मानस असल्याचे मत तेथे हजर असलेल्या लोकांशी बोलतांना त्यांनी व्यक्त केले . यावेळी एरंडोल तालूक्याच्या तहसिलदार सौ.सुचिता चव्हाण ह्या देखील उपस्थित होत्या . हे लोक न्यायालय यशस्वी होण्यासाठी एरंडोल वकील संघाचे विधीज्ञ श्री . एम . एम . महाजन , जेष्ठ विधीज्ञ श्री . ए . एम . काळे , वकील संघातील सदस्य तसेच न्यायालयीन कर्मचारी , पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले . जेष्ठ विधीज्ञ श्री जे . जी . पाटील व श्री . एम . बी . देशमुख यांनी पंच न्यायाधीश म्हणून काम केले . तर प्रमुख पंच म्हणून न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी काम पाहिले .