हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया
अकोट अकोला महामार्गावरील भीषण अपघातात पत्नी ठार.. पती गंभीर
अकोला जिल्ह्यात खराब रस्त्यांमुळे आतापर्यंत अनेक बळी गेले असून रस्त्यांची परिस्थिती बिकट असल्याने तसेच अकोट अकोला महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रेंगाळले असल्याने ह्या रस्त्याने हिवरखेड येथील सौ. वंदना राजेश अग्रवाल या महिलेचा बळी घेतला आहे. सविस्तर असे की हिवरखेड येथील प्रतिष्ठित नागरिक, कस्तुरी हार्डवेअर चे संचालक राजेश जयनारायण अग्रवाल हे सोमवार दि 21 फेब्रुवारी रोजी रात्री आपल्या पत्नीसह अकोल्यावरून खासगी क्रेटा कार क्र. MH 43 AT 9405 ने हिवरखेडला परतत होते. रात्री दहा वाजेच्या दरम्यान कुटासा फाटाच्या जवळ समोरून येणाऱ्या वाहनाचा तीव्र लाईट आल्यामुळे व चांगले रस्ते सुरू असताना अचानक खराब रस्ता आला तसेच समोर रस्त्यावरच बांधकाम साहित्याचे आणि गिट्टी इत्यादींचे ढिगार लागलेले होते आणि तेथे चांगल्या रस्त्यावरून अचानक खराब रस्ता असल्याचे कोणतेही दिशा फलक, रिप्लेक्टर, रेडियम सूचना, इत्यादी काहीही नव्हते त्यामुळे गाडी डाव्या बाजूने ढिगारा वर चढून चार ते पाच पलटी खाऊन उजव्या बाजूच्या रस्त्याच्या पलीकडे जाऊन खाली कोसळली.
अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी आणि जखमी राजेश अग्रवाल यांनी दिली. हा अपघात इतका भीषण होता की ह्या अपघातात सौ वंदना राजेश अग्रवाल (वय 45) यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती राजेश जयनारायण अग्रवाल हे गंभीर जखमी झाले. उपस्थितांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ पोलिसांना आणि 108 ॲम्बुलन्स साठी कॉल केले. वारंवार फोन लावून सुद्धा ॲम्बुलन्स वेळेवर पोहोचली नव्हती. पोलीस मात्र कर्तव्याचे पालन करीत तात्काळ वेळेवर पोहोचले होते. आणि त्यांनी अपघातग्रस्तांना गाडीतून बाहेर काढले होते. त्यांचे नातेवाईक हिवरखेड येथून घटनास्थळावर पोहोचेपर्यंत अपघातग्रस्त तेथेच होते. त्यामुळे दोन्ही अपघातग्रस्तांना वेगवेगळ्या खाजगी वाहनातून अकोट येथे हलविण्यात आले. एका जखमीला उपचारार्थ भरती केल्यावर आणि दुसऱ्याला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर सदर 108 ॲम्बुलन्स कुटासा येथे पोहोचल्याची माहिती मिळाली.
या प्रकरणात दहीहांडा आणि आकोट शहर पोलिसांनी अतोनात सहकार्य केले. सौ वंदना अग्रवाल यांना मृत घोषित केल्यावर दिनांक 22 फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी अकोट ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात हिवरखेड येथे राजस्थानी मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अहो सरकार.. हे रस्ते आणखी किती जणांना अनाथ करणार..??
अकोला जिल्ह्यासह अकोट व तेल्हारा तालुक्यातील नागरिक भयावह रस्त्यांनी आधीच मेटाकुटीस आले असताना आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. ह्या अपघातात सौ वंदना अग्रवाल या महिलेचा अत्यंत कमी वयात मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन्ही मुलांचे मातृछत्र हरवले आहे. ज्यावेळी त्यांचा मुलगा घटनास्थळावर पोहोचला आणि आईला खराब रस्त्यांच्या मधोमध गिट्टी दगडांवर मरणासन्न अवस्थेत पाहिले त्यावेळी त्याने आईच्या नावाने मोठमोठ्याने हंबरडा फोडला. त्यावेळी त्याचे दुःख पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. आपले दुःख व्यक्त करताना त्याने म्हटले की सरकार..हे रस्ते आणखी किती जणांना अनाथ करणार??? त्याचा हा प्रश्न अनेकांना निरुत्तर करून गेला.