हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारीया
भारतीय पौराणिक इतिहासात गार्गी वाचक्नवी, मैत्रैया आदी विदुषींचा तथा त्यांच्या विद्वत्तेचा व त्यांनी महर्षी याज्ञवल्क्यासारख्या विद्वानांचे सोबत केलेल्या शास्त्रार्थाचा सुध्दा उल्लेख आढळतो. परंतु त्यांनी कुणालाही उपदेश केल्याचे वाचण्यात आले नाही. संत मुक्ताबाई मात्र आळंदी स्थित सिध्दबेटातील संत सभेमध्ये भगवंताचे लाडके भक्त नामदेवरायांना कच्चे ठरविले आणि त्यांना विसोबा खेचरांव्दारे अनुग्रहीत करून संत नामदेव , अतिउच्चकोटीचा उपदेश स्वतः करून योगिराज चांगदेव आणि ताटीचे अभंगातून ज्ञानदेव यांना उपदेश करून नामदेव, चांगदेव व ज्ञानदेव असे तीन देव मुक्ताईने वारकरी संप्रदायाला दिल्याचे प्रतिपादन सौ.विद्याताई अरूणजी काशिद यांनी केले.
त्या आज श्री ज्ञानभास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरात आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या ७२६ तिरोभूत सोहळ्यानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सोहळा सुध्दा साजरा करण्यात आला. शिबिरार्थीं विद्यार्थ्यीनी मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत कार्यक्रम सहभागी झाल्या होत्या. तसेच सौ. प्राजक्ता विजयराव राऊत पुणे आदी मान्यवर उपस्थित असलेल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.
