Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रेरणादायी देहाक्षरं

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारिया 

जेष्ठ साहित्यिक काकासाहेब मा. सुरेश पाचकवडे यांनी काल देहाक्षरं हा त्यांचा कथासंग्रह भेट दिला; आणि त्यातील अठरा कथा दोन बैठकीत वाचन केल्या. परिसरात वावरणाऱ्या चालत्या बोलत्या देहांच्या जगण्याचा संघर्ष आणि प्राप्त केलेली सफलता सहजपणे डोळ्यासमोर नुसती उभीच राहिली नाही ; तर त्यातील प्रसंग, व्यक्तिमत्व आणि अक्षरं माझ्या देहावरच उमटत असल्याची अनुभूती झाली.

सावली, वाट्या मुकेपणाच्या, ग्रीष्मपर्व, कधीतरी हे काव्यसंग्रह तसेच 2006 साली गोंदणवेणा व मार्च 2023 ला प्रकाशित झालेला देहाक्षरं हा कथासंग्रह ज्यांच्या मराठी साहित्य विश्वातील मुसाफिरीची उंची प्रकट करतात.आपली माती आणि माणसांच्या भावविश्वाचे प्रभावीपणे साहित्यकृतीतून रेखाटन करणारे, नि अकोल्याच्या कसदार मातीतला कथा -कवितांचा सुगंध मराठी भाषिकांना करून देणारे थोर साहित्यिक मार्गदर्शक व्यक्तिमत्व काकाश्री सुरेश पाचकवडे यांच्या कथा वर्तमानपत्रात वाचायचो, तेव्हापासून त्यांच्या साहित्याचा प्रेमळवाचक मी बनलो आहे.

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वांड:मय निर्मितीचा पु.भा. भावे पुरस्कार 2006 साली त्यांच्या गोंदणवेणा कथासंग्रहास मिळाला आहे. यासोबतच विविध सांस्कृतिक साहित्यिक संस्थांचे पुरस्कार त्यांच्या साहित्य निर्मितीला प्राप्त झाले आहेत. नागपूर व अकोला आकाशवाणी वरूनही त्यांनी आपल्या कथा, कविता, नाटिका सादर केल्या आहेत. नागपूर, अकोला, अमरावती येथील अंकुर, सृजन व शुभम बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा ते राहिले आहेत. आभाळ उंची असूनही "ग" ची बाधा न झालेल्या ह्या व्यक्तिमत्त्वाची प्रत्येक भेट व कथांमधील पात्र जगण्याला प्रेरणा देत असतात.

देहाक्षरं या कथासंग्रहात भेटणाऱ्या विविध पात्रांमध्ये जगण्याची नवी उमेद दिसून येते. आपल्या बऱ्या वाईट कर्माचा न्याय नियती करीत असते हा संदेश देणारी मी चुकले रे असो की कुंकू, देहाक्षरं, गहिवर ही कथा आपल्या अवतीभवती सहजपणे दिसणाऱ्या वाटतात. एकूण या कथासंग्रहातील साऱ्याच कथा मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. स्वतःच्या भावविश्वाला चिंतनशील बनवायला भाग पाडणाऱ्या आहेत.

मागे "कधीतरी" ह्या काव्यसंग्रहाची काकाश्री सुरेश पाचकवडे यांनी दिलेली आठवण भेट अन आता ही "देहाक्षरं" कायम आठवणीत राहणारी, वाचायला घेतली की पानोपानी प्रेरणा देणारी अशीच आहेत. असंच सकस साहित्य मराठी भाषेसाठी त्यांनी लिहीत राहावं ह्या सदिच्छा. -- तुळशिदास खिरोडकार