Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

निळ्या पाखरांची आई - रमाई

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनीधी जितेश करिया 

भीमाच्या नावाचं कुंकू कपाळी लावून डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना खंबीरपणे साथ देत पोटी जन्म घातलेल्या लेकरांचीच नाही तर अवघ्या निळ्या पाखरांची आई म्हणून रमाई समर्थपणे जगल्याच्या असंख्य पाऊलखुणा इतिहासाच्या पानात ठळकपणे दिसतात.

भारताच्या इतिहासात ज्या कर्तबगार स्त्रिया होऊन गेल्या त्यापैकीच एक रमाबाई आंबेडकर. भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या झंझावातासोबत चौफेर दुःख पेरलेले असतांना अवघा संसार सुखाचा करणारी रमाबाई दीन दलित, वंचित समुदायाला कुटुंब मानणारी निळ्या पाखरांची आई ठरली. भारतीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल करणारे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च शिक्षण आणि त्यांची खरी क्षमता साधण्यात मोलाचा वाटा त्यांची सहचरिणी रमाबाई यांचाच असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. डॉ. बाबासाहेब सुद्धा रमाबाई यांची संसारातील औदार्यता आनंदाने कबूल करायचे. अतिशय साध्या पद्धतीने रमाबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये १९०६ साली पार पडला होता.

त्यावेळी रमाई यांचे वय ९ आणि बाबासाहेबांचे वय १४ वर्षे होते. माता रमाबाई यांना जीवनात खूप दुःख सहन करावे लागले. मात्र त्यांनी आपल्या दु:खाची झळ कुटूंबातील सदस्यांना व विशेष करून डॉ. बाबासाहेबांना कधीच पोहचू दिली नाही. पावलोपावली संकटांचा गुणाकार करणारी परिस्थिती त्यांच्या पुढ्यात असायची. ह्या साऱ्या परिस्थितीला रमाईने आयुष्यभर धीराने तोंड दिले. १९२३ साली बाबासाहेब जेव्हा शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले त्यावेळी रमाई व कुटुंबाचे खूप हाल झाले त्यांचे हे हाल पाहून बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी काही पैसे मदत म्हणून देऊ केले. कार्यकर्त्यांच्या स्नेहील भावनांचा आदर त्यांनी केला पण पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी डॉ. बाबासाहेब यांची स्वाभिमानी पत्‍नी

रमाबाई जिद्दीने दुःखाशी,  अडचणींशी, गरिबीशी भांडत राहिल्या. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कारणास्तव डॉ. बाबासाहेब नेहमीच देश, परदेश भ्रमंतीवर असायचे. स्वदेशात घरी असले तरी, कुटुंबापेक्षा देशातील दीन दलित, महिला यांच्या उत्थानासाठी काय करता येईल? याचेच विचार मंथन, त्यावरचं अध्ययन ते करत असत. त्यामुळे रमाबाई व कुटुंब यांच्याकडे फारसे लक्ष त्यांना देत येत नव्हते. शक्य असेल तेव्हा मात्र ते कुटुंब व रमाबाई यांची विचारपूस करून दीन, दलित, महिलांना सन्मानाने जगण्याचा हक्क याबाबत बोलायचे. देशभर आपले पती डॉ. बाबासाहेब यांना बाबा म्हणून संबोधित करणारा समुदाय पाहून त्या सुखावत असत. 

त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरी भेटायला येणारे कार्यकर्ते असो वा पाहुणे यांची व्यवस्था त्या कुटुंबातील लेकरांप्रमाणे करत असत. एकदा अचानक बाबासाहेबांना  काही कामा निमित्त परदेशात जावे लागले, तेव्हा त्यांनी रमाईला धारवाड मध्ये वराळे काका यांच्याकडे राहण्यास पाठवले. धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह वराळे काका यांच्या मार्गदर्शनात चालवले जात होते. वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. दोन तीन दिवस मुले वसतिगृहात फिरकली नसल्याचे रमाबाई यांना जाणवले. वराळे काका बाहेरून येताच त्यांनी मुलं का येत नाहीत याबद्दल विचारणा केली. तेव्हा काका म्हणाले की, वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही. ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अन्नाचा साठा शिल्लक नाही त्यामुळे व्यवस्था होई पर्यंत मुलांना खाऊ घालण्याचा प्रश्न मला बेचैन करत आहे. त्यामुळे अजून तरी तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत. हे ऐकून वात्सलमूर्ती रमाबाई यांना अतीव दुःख झाले त्यांना रडायला आलं. त्या स्वतःला सावरत आपल्या खोलीत गेल्या आणि आपल्या जवळ असलेला सोन्याचा डबा, हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्यांनी वराळे काका यांना आणून दिल्या आणि म्हणाल्या, ह्या बांगड्या आणि डब्यातील सोने विकून किंवा गहाण ठेवून लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या, मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. हे सारं ऐकून वराळे काका रमाबाई च्या औदार्यासमोर नतमस्तक झाले. बाजारात जाऊन लहान मुलांसाठी जेवणाचे सामान आणून लहान मुलांना पोटभरून जेवण दिल्या गेले. दीन, दलितांची मुलं जेवण करतांना पाहून रमाई यांना त्यावेळी खूप आनंद झाला.

जेवणा नंतर ही सगळी लहान मुले रमाबाई यांना “रमाआई” म्हणून संबोधू लागली आणि त्या क्षणा पासून रमाबाई ह्या कोट्यावधी दीन, दलित, वंचित समुदायाच्या, निळ्या पाखरांच्या आई - रमाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. धन्य ती रमाई अन धन्य तिचे वात्सल्य. माता रमाईला जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

--- तुळशिदास खिरोडकार हिवरखेड